जळगाव । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात एका वृद्धाला ‘शनीची महादशा’ काढण्याच्या बहाण्याने गंडा घालण्यात आला आहे. भोंदूबाबाने हातचालाखीने खड्याचा रुद्राक्ष बनवून दाखवत गजानन विठोबा सर्जेराव यांची सोन्याची अंगठी आणि रोख ९०० रुपये लंपास केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 67 वर्षीय गजानन विठोबा सर्जेराव हे 20 एप्रिल रोजी कामानिमित्त जळगावच्या नवीन बसस्थानकात आले होते. त्यावेळी दोन भोंदूबाबांनी त्यांच्याशी संवाद साधत “तुमच्यावर शनीची महादशा सुरू आहे” असे सांगून भीती निर्माण केली. “तुमचा शनी काढून देतो” अशी थाप मारत त्यांनी वृद्धाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोन ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि 900 रुपये घेऊन दोघेही पसार झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्जेराव यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस नाईक राजेश पदमर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.















Discussion about this post