जळगाव । मुंबई ते मध्य प्रदेशला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रिवा दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाड्यांना आता नियमित सेवेचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव आणि भुसावळसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, या मार्गावरील प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या ०२१८७/०२१८८ क्रमांकाच्या साप्ताहिक विशेष गाड्यांचे रूपांतर नियमित सेवेमध्ये केले आहे. त्यानुसार, गाडी क्रमांक २०१५३ ही साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून २४ एप्रिलपासून धावणार आहे, तर गाडी क्रमांक २०१५४ ही रिवा ते सीएसएमटी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २३ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक २०१५३ ही दर शुक्रवारी दुपारी १:३० वाजता सीएसएमटी येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९:४५ वाजता रिवा येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक २०१५४ ही दर गुरुवारी दुपारी ३:५० वाजता रिवा येथून सुटून दुसऱ्या दिवशी १२:२० वाजता मुंबईत पोहोचेल.
या गाड्यांना दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रवाशांना थेट व सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.















Discussion about this post