मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कथित जमीन खरेदी व्यवहारावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खडाळे गावातील आदिवासी कुटुंबांच्या जमिनी आणि घरांशी संबंधित हा प्रश्न असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनुसार, खडाळे गावातील सुमारे २० आदिवासी कुटुंबांच्या जमिनींच्या व्यवहाराचा हा विषय आहे. या कुटुंबांची घरे पाडण्यात आली असून, वीज आणि पाणीपुरवठा खंडित करून त्यांना विस्थापित केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या प्रकरणातील संबंधित जमीन राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावावर खरेदी केल्याचा दावा राऊत यांनी पत्रात केला आहे. तसेच आणखी जमीन खरेदी करण्यासाठी नार्वेकर आणि त्यांचे नातेवाईक मकरंद यांच्याकडून आदिवासींवर पोलिसांच्या माध्यमातून दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या प्रकरणावर सरकारला सवाल केला. आदिवासी आपल्या जमीन आणि घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार नेमके कोणाच्या बाजूने आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘पदाचा गैरवापर केल्याचा’ राऊतांचा आरोप
पत्रकार परिषदेतही संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. नार्वेकर हे घटनात्मक पदावर असून आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस, महसूल आणि नगरविकास विभागावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.खडाळे येथील आदिवासी कुटुंबांच्या घरांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ही घरे सरकारी योजनेतून बांधण्यात आलेली असल्याने त्यांची खरेदी-विक्री करता येते का, असा सवाल राऊत यांनी केला. तसेच नार्वेकरांच्या कथित एजंटने बुलडोझरच्या मदतीने घरे पाडल्याचा आरोपही त्यांनी केला.
SIT चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित आदिवासी कुटुंबांचे संरक्षण करावे आणि त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्यावरील या आरोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणात सरकारकडून काय भूमिका घेतली जाते आणि आरोपांवर नार्वेकरांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.














Discussion about this post