तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत विविध विभागांमधील भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २,६१९ पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता लवकर अर्ज करावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन इच्छुनक उमेदवार ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत सर्वाधिक १,८६४ रिक्त जागा लिपिक-टंकलेखक पदासाठी आहेत. ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, २८२ कर सहाय्यक, ९ उद्योग निरीक्षक आणि ३ तांत्रिक सहाय्यक पदं भरली जाणार आहेत. ही निवड संबंधित पदासाठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि कौशल्य चाचणी यावर आधारित असणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. प्रति मिनिट ३० शब्द मराठी किंवा प्रति मिनिट ४० शब्द इंग्रजी टायपिंगचे कौशल्य असणे आवश्यक आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी अनिवार्य आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी किमान वय १८ किंवा १९ वर्षे असणार आहे. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल वय ३८ वर्षे असणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये ५ वर्षांची सवलत मिळणार आहे. २७ सप्टेंबर २०२६ रोजी १०० गुणांच्या संयुक्त प्राथमिक परीक्षा होणार आहे. या परीक्षेत यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. संबंधित पदांसाठी नंतर टायपिंग टेस्ट किंवा कौशल्य चाचणी देखील घेतली जाईल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्याठिकाणी असलेल्या ऑनलाइन सुविधा या पर्यायावर क्लिक करून नंतर ऑनलाइन अर्ज प्रणाली यावर क्लिक करावे. त्यानंतर, नोंदणी करा आणि अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा. शेवटी अर्ज मंजूर झाल्यावर त्याची प्रिंट काढून घ्या.















Discussion about this post