ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनावरून सरकारवर गंभीर आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर सुटका करण्यात आली. सुटकेनंतर पक्षाचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आशुतोष रांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, ‘नरेंद्र मोदी यांच्यासारखा भित्रा पंतप्रधान भारतात आतापर्यंत पाहिला नाही,’ असे वक्तव्य केले. दरम्यान, अभिजीत दिपके हे त्यांच्या आजीच्या निधनामुळे कुटुंबीयांच्या भेटीसाठी हिंगोलीला रवाना झाले.

आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत मागील ७२ तासांतील घटनांवरून केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. आंदोलनासाठी निघालेल्या हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली आणि संपूर्ण परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थिती अधिक बिघडवली असून, या घटनांमुळे देशाची बदनामी झाल्याचा आरोपही रांका यांनी केला.
‘आम्हाला विमानातून किडनॅप करण्यात आले,’ असा आरोप करत रांका यांनी सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाचे महान पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली.
आणीबाणीच्या काळापेक्षाही गंभीर परिस्थिती असल्याचा आरोप
रांका म्हणाले की, त्यांनी आणीबाणीच्या काळाबद्दल आई-वडिलांकडून ऐकले होते. मात्र, मागील ७२ तासांत घडलेल्या घटनांमुळे त्या काळाची आठवण झाली. १९७५ मध्येही रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या नव्हत्या; मात्र आता अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
कॉक्रोच जनता पार्टीची लढाई मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात होती. मात्र, नरेंद्र मोदी यांनी ही लढाई स्वतःकडे वळवून घेतली आहे, असा आरोप रांका यांनी केला. ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याची भूमिका पंतप्रधानांनी घेतल्याचे या घटनांमधून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.
‘निवडणूक आयोग भाजपला जिंकवण्यासाठी काम करत आहे’
निवडणूक आयोगाची जबाबदारी लोकशाहीचे संरक्षण करण्याची असते. मात्र, आयोग भाजपला निवडणुका जिंकून देण्यासाठी काम करत असल्याचा आरोप रांका यांनी केला. ज्ञानेश कुमार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.














Discussion about this post