अशोक खरात यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. शिर्डीजवळ असलेल्या धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. या घटनेत शेळके यांच्या पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह संभाजीनगरहून कारने शिर्डीच्या दिशेने जात होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर होऊन ती थेट कंटेनरच्या खाली घुसली. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी कारमध्ये बराच वेळ अडकून पडल्या होत्या. बचाव पथकाने मोठ्या शर्थीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
अपघात की घातपात? चर्चेला उधाण
अशोक खरात यांना अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर येत आहे. खरात यांच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे ते उपाध्यक्ष होते आणि त्यांच्या लॉन्समध्येही शेळके यांची भागीदारी होती. खरात प्रकरणाशी असलेल्या त्यांच्या निकटच्या संबंधामुळे या अपघाताबाबत आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संशयाची पाल चुकचुकत असून, हा केवळ अपघात आहे की घातपात? अशी चर्चा सुरू झाली आहे.
ट्रक चालक पसार
अपघातानंतर ट्रक/कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या अपघाताचा संबंध खरात प्रकरणाशी आहे का? या दृष्टीनेही आता तपास यंत्रणांना विचार करावा लागणार आहे.















Discussion about this post