जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, या निवडणुकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील हे दिग्गद नेते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांने माघार घेतल्यामुळे महाजन यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाजप कार्यकर्त्याची माघार, ‘भाऊ फक्त तुमच्यासाठी’चा फलक:
जिल्हा बँक निवडणुकीसाठी मंत्री गिरीश महाजन हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले होते. जामनेर विकास सोसायटी मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात भाजपचेच कार्यकर्ते तुकाराम निकम यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, निवडणुकीच्या ऐन मोक्यावर तुकाराम निकम यांनी माघार घेतली. विशेष म्हणजे, “मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो आणि भाऊ फक्त तुमच्यासाठी” असा आशय असलेला फलक हातात घेऊन त्यांनी माघार घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे जामनेर विकास सोसायटी मतदारसंघातून गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड पक्की झाली आहे.
भाजपच्या दोन जागा बिनविरोध:
जिल्हा बँकेच्या या पहिल्याच निवडणुकीत मंत्री महाजन यांनी बिनविरोध एंट्री केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यासह जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत भाजपच्या एकूण दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीनंतर आता जिल्ह्याचे पालकमंत्री व नेते गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेकडे आणि त्यांच्या मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.















Discussion about this post