मुंबई । राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या अनावरणावरून अमित शाह यांच्यावर टीका केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निशाणा साधला आहे. ‘अमित शाह यांनी अजितदादांचं जगणं मुश्किल केलं होतं,’ असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “अजितदादा हयात असताना त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्याच अजितदादांच्या स्मारकाचे लोकार्पण काल अमित शाह यांनी केले. अजितदादा हयात असताना आरोप केले आणि काल त्यांनी नाक रगडलं.”
यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशातील विविध राज्यांतील परिस्थितीचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भूमिकेवरही टीका केली. मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातील घटनांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी संबंधित ठिकाणी जावे, असे ते म्हणाले. तसेच अमित शाह यांनी मध्यरात्री किंवा कोणत्याही वेळी अजितदादांच्या पुतळ्याजवळ जाऊन माफी मागायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून अमित शाह यांच्यावर टीका केली होती. अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणे, ही त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची विडंबना असल्याचे राऊत म्हणाले होते.
राऊत यांनी अजित पवार यांच्यावर भाजपकडून करण्यात आलेल्या जुन्या आरोपांचाही उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली अजित पवार होते, असा आरोप त्यांनी केला. सिंचन घोटाळ्याप्रकरणी ७० हजार कोटी रुपयांच्या आरोपांचा सातत्याने प्रचार करून अजित पवार यांना बदनाम करण्यात आले. तसेच त्यांच्यावर दबाव टाकून शरद पवार यांचा पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले, असा दावाही राऊत यांनी केला.
अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.















Discussion about this post