जळगाव । जळगाव शहरातील असोदा रोड परिसरात मंगळवारी (दि. १७) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. घरामागील खुली वायर कट करत असताना तरुण मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला. आपला तरुण मुलगा संकटात असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही विजेचा तीव्र शॉक लागला. या दुर्दैवी घटनेत माय-लेकाचा उपचारापूर्वीच जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुनंदा राजू सपकाळे (वय ५०) आणि राहुल राजू सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड, जळगाव) असे मृत माय-लेकाची नावे आहेत.
अशी घडली दुर्देवी घटना:
मंगळवारी सकाळी असोदा रोड येथील राहत्या घरामागे असलेली एक वायर कट करण्यासाठी राहुल सपकाळे हा तरुण गेला होता. यादरम्यान अचानक आलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्याला तीव्र विजेचा धक्का बसला आणि तो जागीच अडकला. मुलगा अडचणीत आल्याचे पाहताच आई सुनंदा सपकाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि दोघेही गंभीर जखमी झाले.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत घोषित:
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने धाव घेत दोन्ही माय-लेकांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. एकाच घरातील माय-लेकाचा असा अचानक आणि अवेळी मृत्यू झाल्याने रुग्णालयात नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे मयत महिलेचे पती राजू सपकाळे व इतर कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला असून, त्यांच्या दुःखाला पारावार उरलेला नाही.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.















Discussion about this post