जळगाव । जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली. १६ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये दारू, जुगार, अंमली पदार्थ, अवैध शस्त्रे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत गावठी दारू व रसायनांचा मोठा साठा जप्त अथवा नष्ट करण्यात आला, तर ४२ चोरीस गेलेले व हरविलेले मोबाईल शोधून संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या माध्यमातून स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापे, तपासणी आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली.
गावठी दारूविरोधात सर्वाधिक कारवाई
मोहिमेत गावठी हातभट्टी दारूविरोधात सर्वाधिक कारवाई झाली. जिल्ह्यात १२४ गुन्हे दाखल करून १२० आरोपींवर कारवाई करण्यात आली. यावेळी ५ हजार ७२५ लिटर गावठी दारू आणि २८ हजार ९७२ लिटर रसायन जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत २० लाख ६७ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.देशी-विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणीही १२ गुन्हे दाखल करून १२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यात देशी दारूच्या ४२० बाटल्या आणि विदेशी दारूच्या २५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ६१ हजार ८०५ रुपये आहे.
जुगार आणि शस्त्रांवरही कारवाई
जुगारविरोधी कारवाईत जिल्हाभरात ४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६० जणांवर कारवाई झाली. या कारवाईत ९१ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अवैध शस्त्रांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन आरोपींवर कारवाई करत दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.
गांजासह ११ गुन्हे दाखल
अंमली पदार्थांविरोधात एकूण ११ गुन्हे दाखल करून ११ आरोपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दहा प्रकरणे अंमली पदार्थ सेवनाशी संबंधित असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत ३ किलो २५० ग्रॅम गांजा, अंदाजे १ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला.
वाहतूक नियम तोडणाऱ्यांवरही कारवाई
‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८७ चालकांवर, धोकादायक वाहन चालविण्याच्या कलम १८४ अंतर्गत सहा जणांवर, तर कलम ६६/१९२ अंतर्गत ६३ कारवाया करण्यात आल्या. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या १३३ जणांवर आणि महामार्गावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्या ६१ वाहनचालकांवर कारवाई झाली. इतर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी १ हजार ५७ कारवाया करण्यात आल्या. या कारवाईतून ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
४२ हरविलेले मोबाईल मालकांना परत
या मोहिमेतील नागरिकांसाठी महत्त्वाची कामगिरी म्हणजे हरविलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याची कारवाई. CEIR पोर्टलच्या माध्यमातून ४२ मोबाईल फोन हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. याशिवाय पोलिसांनी १७ हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेतला. यात पाच महिला, सात पुरुष आणि पाच मुलींचा समावेश आहे.
भंगार दुकाने, पानटपऱ्या आणि हॉटेल्सची तपासणी
जिल्ह्यातील १९० भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच ठिकाणी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात कोटपा कायद्यान्वये १०० गुन्हे दाखल करण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यातील १८० हॉटेल आणि लॉजेसचीही तपासणी करण्यात आली. सराईत गुन्हेगारांची पडताळणी करताना ५०७ जणांची तपासणी झाली असून, त्यापैकी ११ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावण्यात आले. हद्दपारीचे आदेश असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आठ आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी-अंमलदारांनी राबविली.















Discussion about this post