कामगार, उद्योजकांसह विविध घटकांना मार्गदर्शन*
जळगाव | केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभरात राबविण्यात येत असलेल्या चार नवीन कामगार संहितांबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात १६ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष ‘श्रम संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवीन कामगार संहितांची अंमलबजावणी, त्यातील तरतुदी, नियोक्ते व कामगारांच्या जबाबदाऱ्या, तसेच संबंधित रोजगार आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती विविध घटकांपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाच्या व्यापक जनजागृती, प्रबोधन व क्षमता बांधणी उपक्रमाचा हा एक भाग आहे.
कार्यक्रमात वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थितीची संहिता २०२० आणि सामाजिक सुरक्षा संहिता २०२० या चार संहितांमधील महत्त्वपूर्ण तरतुदींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या अनुपालनाची प्रक्रिया, कामगार व नियोक्त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या याबाबत माहिती या कार्यक्रमात दिली जाणार आहे. या संहितांच्या अंमलबजावणी संदर्भातील शंका व अडचणींचे निरसनही करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, कामगार विभाग आणि संबंधित शासकीय विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जनजागृती उपक्रमांतर्गत पीएमव्हीबीआरवाय आणि पीएमएसवायएम योजनांचीही माहिती देण्यात येणार आहे.
या श्रम संवादात जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, उद्योग क्षेत्र, औद्योगिक संघटना, कामगार कायदेतज्ज्ञ, मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील प्रतिनिधी, नियोक्ते, वित्त क्षेत्रातील व्यावसायिक, सनदी लेखापाल, जिल्हा उद्योग केंद्र तसेच अन्य संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कामगार विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याचे सहाय्यक आयुक्त कामगार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
*कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ :* आर. जे. फूड प्रॉडक्ट पार्ले बिस्किट हॉल, प्लॉट क्रमांक एच-१०, पुष्पा पेट्रोल पंपासमोर, आरजे चौफुली, एमआयडीसी, जळगाव येथे दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.















Discussion about this post