भुसावळ । अंमली पदार्थांच्या अवैध धंद्यांविरोधात जळगाव पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात शुक्रवारी पहाटे पोलिसांनी अचानक छापा टाकत एमडी ड्रग्जचा साठा उघडकीस आणला. या कारवाईत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोनसह दोन दुचाकी आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या साहित्याची एकूण किंमत ७ लाख २८ हजार ८४० रुपये आहे.
किन्ही एमआयडीसी परिसरात पहाटेच्या वेळी काही जण दुचाकींवरून येऊन संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत भुसावळ तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त मोहीम आखली. शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी पहाटे २.५५ वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा मारला. या वेळी पोलिसांच्या ताब्यात चार जण आले.
या कारवाईत रिशभ कुणाल खेडकर (१८, रा. कंडारी), प्रथमेश दिलीप आव्हाड (२७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी), शेख अफजल शेख रहेमतुल्ला (२६, रा. नसरंजी फाईल) आणि असगरखान अनवरखान (५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एका आरोपीकडून ५५ ग्रॅमपेक्षा अधिक ड्रग्ज
पोलिसांनी केलेल्या झडतीत ६२.२१ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. या अंमली पदार्थाची किंमत २ लाख ४८ हजार ८४० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकूण जप्त साठ्यापैकी ५५.३३ ग्रॅम एमडी असगरखान अनवरखान याच्याकडून मिळाली. याशिवाय रॉयल एनफिल्ड बुलेट आणि पल्सर या दोन दुचाकी, तसेच आयफोन १६, आयफोन १३ यांसह चार मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. दुचाकींची किंमत ३ लाख २५ हजार रुपये, तर मोबाईलची किंमत १ लाख ५५ हजार रुपये आहे. अंमली पदार्थ आणि इतर साहित्य मिळून पोलिसांनी ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
पुरवठ्याचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या एमडी ड्रग्जचा पुरवठा कुठून झाला, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह तालुका पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने मोहिमेत सहभाग घेतला. पहाटेच्या या कारवाईमुळे भुसावळ परिसरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी जोरदार प्रहार केला आहे.















Discussion about this post