जामनेर : तालुक्यातील मालदभाडी शिवारात शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा प्रकार जामनेर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ किलो ४३० ग्रॅम वजनाचा गांजा मुळासकट जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये आहे.
जामनेर पोलिसांना ५ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दुपारी २.१५ वाजता मालदभाडी, ता. जामनेर येथील शेतात छापा टाकला. यावेळी आरोपी अनिल दगडू पाटील (रा. मालदभाडी, ता. जामनेर) याच्या मालकीच्या शेतात प्रतिबंधित कॅनाबिस वनस्पती अर्थात गांजाची झाडे आढळून आली.
पोलिसांनी ही गांजाची झाडे मुळासकट जप्त केली. एकूण वजन १३ किलो ४३० ग्रॅम असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच भविष्यात चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आरोपी अनिल दगडू पाटील याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(ब) आणि २०(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम तसेच पाचोरा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंके, ग्रे.पो.उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्यासह जामनेर पोलीस पथकाने केली.
शेतातच गांजाची लागवड करून त्याची चोरट्या विक्रीचा प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आल्याने जामनेर तालुक्यात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post