अमळनेर । रोजगार व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या नांद्री येथील तरुणांनी आपल्या जन्मभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येत ‘नांद्री विकास मंच’ची स्थापना केली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करत मंचाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर स्थापन झालेल्या या मंचाच्या वतीने देशात सुरू असलेल्या ‘सेवा सप्ताहा’चे औचित्य साधून ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळा, नांद्री येथील सुमारे ४० गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय उपयोगी साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

“आपण किती शिकलो यापेक्षा आपल्या शिक्षणाचा समाजाला किती उपयोग होतो, हे महत्त्वाचे आहे,” या विचाराने प्रेरित होऊन हा उपक्रम राबविल्याचे मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. “आम्ही याच शाळेत घडलो आणि आज बाहेरच्या जगात उभे आहोत. त्यामुळे आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आपली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यापुढील काळात शेती, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती या विषयांवर सातत्याने काम करण्याचा निर्धार मंचाने केला आहे. तसेच गावात निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण व ग्रामविकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सीएसआर निधी, लोकवर्गणी तसेच ग्रामस्थांच्या श्रमदानातून नाला खोलीकरण, पाणलोट बंधारे आणि अन्य जलसंधारणाची कामे हाती घेण्याचा मानस मंचाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नांद्री विकास मंचाच्या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातील सामाजिक व ग्रामविकासाच्या कामांसाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
धावपळीच्या जीवनात आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र आलेल्या नांद्रीच्या तरुणांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत असून, गावाच्या विकासासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची प्रेरणा देणारा ठरत आहे.















Discussion about this post