पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे नाथ मंदिर परिसरात आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रशासकीय कामांबाबत प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला माजी सरपंचाने मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र (N.C.) गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय?

ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना गावातील एका सुजाण तरुणाने ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामांविषयी काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी चर्चा सुरू असताना माजी सरपंच तथा बाजार समिती संचालक सुनील पाटील यांनी मध्यस्थी करत बोलण्यास सुरुवात केली. त्यावर संबंधित तरुणाने, “मी तुम्हाला नाही, तर थेट प्रशासकाला जाब विचारत आहे,” असे स्पष्ट शब्दांत बजावले.या उत्तरामुळे संतापलेल्या सुनील पाटील यांनी वादात शब्दांऐवजी थेट बळाचा वापर करत त्या तरुणाला भरसभेतच मारहाण केली.
लोकशाहीच्या या व्यासपीठावर घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीस ठाण्यात तक्रार दाखलभरसभेत झालेल्या मारहाणीनंतर पीडित तरुणाने थेट पाचोरा पोलीस ठाणे गाठून सुनील पाटील यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे अदखलपात्र (N.C.) गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.
दरम्यान,या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी सरपंच सुनील पाटील यांनी यामागे वैयक्तिक वाद असल्याचे म्हटले आहे. “संबंधित तरुणाच्या घरातील सांडपाणी सातत्याने माझ्या प्लॉटमध्ये सोडले जाते, ज्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.दरम्यान, ग्रामसभेसारख्या हक्काच्या व्यासपीठावर नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी थेट हाणामारी केल्यामुळे संपूर्ण पाचोरा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.















Discussion about this post