जळगाव । राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, अनेक भागांमध्ये मान्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे जळगावसह राज्यातील काही भागांत उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे.

दुसरीकडे, जळगावसह विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासोबत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे. या भागात पावसाची शक्यता कमी असून, काही ठिकाणी तापमानाचा पारा चढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जळगावकरांना पुन्हा एकदा ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच जळगावमध्ये उकाड्याचे चटके जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांत शहराच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारी जळगावचे कमाल तापमान ३७.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यातील काही भागांत परतीचा पाऊस सुरू असतानाच जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मात्र उन्हाचा प्रभाव वाढत आहे. कडक ऊन आणि हवेत असलेली आर्द्रता यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जळगावसह राज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post