जळगाव । हिमाचल प्रदेशात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील चार फरारी संशयितांना जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जेरबंद केले आहे. हिमाचल पोलिसांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलिस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. मयत मुकेश कुमार आणि संशयित आरोपी एकत्र मद्यप्राशन करत असताना, बहिणीवरून झालेल्या वादातून हा खून करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी मुकेश यांचा मृतदेह तलावात फेकून पळ काढला होता.

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता किसनपूर येथून निघालेले हे चारही संशयित अंबाला मार्गे अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने पसार होत होते. मात्र, वाटेतच त्यांचे पैसे संपल्याने आणि प्रचंड भूक लागल्याने मोबाईल विकण्यासाठी ते जळगाव रेल्वे स्थानकावर उतरले.
मोबाईल लोकेशन ठरले पोलिसांचे हत्यार
फरार संशयितांचे मोबाईल लोकेशन जळगावमधील शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय झाल्याचे हिमाचल पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली.
या माहितीची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक जयस्वाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करत गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कसून शोध घेत चारही संशयितांना शनिपेठ हद्दीतून शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये चंदन कुमार (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर) आणि अजित कुमार (रा. पंडरक, पाटणा) यांचा समावेश आहे. सध्या या कारवाईची माहिती हिमाचल प्रदेशातील मानपुरा पोलिसांना देण्यात आली असून, पुढील कायदेशीर व तातडीच्या कारवाईसाठी संशयितांना त्यांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे आणि शनिपेठ निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे तसेच पोलिस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांच्या पथकाने पार पाडली आहे.














Discussion about this post