मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, तसेच एसआयआर (SIR) अंतर्गत मतदार यादीची प्रक्रिया तातडीने स्थगित अथवा फ्रीझ करण्यात यावी, अशी मागणी CJPचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी केली आहे. राजीनामा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. CJPने २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

पत्रकारांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. “नैतिकतेचा जराही भाग शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे,” असे दीपके म्हणाले. राजीनामा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि पुढील टप्प्यात दिल्लीतील जंतरमंतरवर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

याशिवाय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती प्रक्रिया भविष्यात पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणीही CJPकडून करण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी दीपके यांनी केली.
CJPकडून २ ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर गोवा, बंगळुरू आणि पुढे दिल्लीपर्यंत आंदोलन नेण्याची भूमिका दीपके यांनी मांडली आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“गेल्या १२ वर्षांपासून लोक घाबरत होते; आता लोक घाबरत नाहीत. लोक घराघरांतून आंदोलनासाठी बाहेर पडतील,” असा दावा अभिजीत दीपके यांनी केला. CJP आपल्या मूळ मुद्द्यापासून बाजूला जाणार नसल्याचे सांगताना, “आम्ही मुद्द्यापासून भटकलो तर लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या तरी आम्ही खाऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक आयोगाने मात्र अंतर्गत मतभेद अथवा वेगवेगळी मते ही कामकाजातील सामान्य बाब असल्याचे स्पष्ट केले असून, SIRसह मागील वर्षातील निर्णय सर्वसंमतीने झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरपासून CJPच्या आंदोलनाची दिशा काय राहणार आणि त्यानंतर आंदोलन किती व्यापक केले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post