मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. ‘आम्ही कोणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्या या’, असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी काळात पक्षाची वाटचाल त्याच ताकदीने सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीवर भाष्य केले.

‘आम्ही कुठेही विलीन होणार नाही’
पक्षाच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करताना शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष असून, अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा किंवा विलीन होण्याचा प्रश्न नाही, असे त्यांनी सांगितले.‘आम्ही कुणाच्याही जवळ जाणार नाही किंवा इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही,’ असा संदेश पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगण्यात आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
२६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ; मदतीवरून सरकारवर टीका
दरम्यान, राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी जमीन महसुलात सवलत, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि कर्जवसुलीला स्थगिती यांसारख्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
मात्र, या उपाययोजनांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असली तरी कर्जमाफी झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कायम राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले.फळबागांसाठी मदत जाहीर करण्यात आली असली तरी जळगाव, परभणी आणि नांदेडमध्ये घेतल्या जाणाऱ्या केळी पिकाचा समावेश करण्यात आलेला नाही, असा आक्षेपही पवार यांनी घेतला. तसेच शेतमजूर, दलित आणि आदिवासी घटकांनाही दुष्काळी मदतीत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठवल्याचे सांगितले. यापूर्वीही त्यांनी राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.शेतकरी आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांवर योग्य निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा पवार यांनी दिला. त्यामुळे दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.















Discussion about this post