मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आता ठाकरे बंधूंनी (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) त्यांच्या विरोधात थेट दंड थोपाटले आहेत. निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या कथित गैरप्रकारांविरोधात येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत एका महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना व जनतेला या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

‘एसआयआर’ प्रकरणावरून तीव्र संताप
ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची घोर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ठाकरे बंधूंनी केला आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था म्हणून काम करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची शाखा बनल्याची टीका यावेळी करण्यात आली. हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून, देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काढला जाणारा ‘तमाम जनतेचा आवाज’ असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

संजय राऊतांची राज ठाकरेंशी भेट
या महामोर्चाच्या नियोजनासाठी आज सकाळी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोर्चाची अधिकृत घोषणा केली. लवकरच या मोर्चाची वेळ आणि ठिकाण जाहीर केले जाणार आहे.
कॉकरोच जनता पार्टीचाही अल्टिमेटम
दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनीही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्ञानेश कुमार यांनी २ ऑक्टोबरच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा मुंबईसह देशभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. आधीच विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात असंतोष असताना, आता निवडणूक आयुक्तांवरील या कारवाईच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आता या वाढत्या दबावामुळे केंद्र सरकार ज्ञानेश कुमार यांच्यावर काय भूमिका घेते आणि त्यांची हकालपट्टी होते का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post