भारतीय तटरक्षक दलात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तटरक्षक दलाकडून स्टोअरकीपर, इंजिन ड्रायव्हर, सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर आणि एमटीएस यांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ नोव्हेंबर २०२६ आहे.

१०वी-१२वी पास उमेदवारांना संधी

या भरतीसाठी पदानुसार १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही मागविण्यात आला आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेसोबत अनुभवाची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना या भरतीत सहभागी होता येणार आहे.
पदानुसार पगार किती?
निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वेतनश्रेणी मिळणार आहे.
स्टोअरकीपर: ₹१९,९०० ते ₹६३,२००
इंजिन ड्रायव्हर: ₹२५,५०० ते ₹८१,१००
सिव्हिलियन मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर: ₹१९,९०० ते ₹६३,२००
एमटीएस: ₹१८,००० ते ₹५६,९००
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. पदानुसार कमाल वयोमर्यादा २७ आणि ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड विविध टप्प्यांद्वारे केली जाणार आहे. सुरुवातीला अर्जांची छाननी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी आणि लेखी परीक्षा घेतली जाईल.
लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, सामान्य इंग्रजी आणि संबंधित ट्रेडशी संबंधित विषयांवर प्रश्न विचारले जातील. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना पात्र होण्यासाठी किमान ५० टक्के, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना पुढील टप्प्यात ट्रेड टेस्टसाठी बोलावले जाईल.
अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती तयार ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश आहे :
ओळखपत्र
१०वी किंवा समकक्ष प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
ना हरकत प्रमाणपत्र (NOC), लागू असल्यास
दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र
३ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची संधी
भारतीय तटरक्षक दलातील या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३ नोव्हेंबर २०२६पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून संबंधित पदाची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर अटी तपासाव्यात.















Discussion about this post