जळगाव । लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्साहात तयारी सुरू असतानाच, जळगाव शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जुने जळगाव परिसरातील तळेले कॉलनीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय आईने आपल्या अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलासह गळफास घेऊन जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहरात प्रचंड हळहळ आणि शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जुने जळगावजवळील तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौकाजवळ महाजन कुटुंबीय वास्तव्यास आहे. मृत महिलेचे नाव हेमांगिनी निखील महाजन (वय २८) असून त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाचे नाव शौर्य असे आहे. हेमांगिनी यांचे पती निखील महाजन हे भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असून सध्या त्यांची राजस्थान येथे नेमणूक आहे. तळेले कॉलनीतील घराच्या तळमजल्यावर निखील महाजन यांचे कुटुंब, तर पहिल्या माळ्यावर त्यांचे भाऊ अक्षय महाजन राहतात.
सोमवारी दुपारी हेमांगिनी महाजन या मुलगा शौर्य याच्यासह तळमजल्यावरील घरात होत्या, तर इतर कुटुंबीय पहिल्या माळ्यावर होते. सायंकाळाच्या सुमारास निखील यांच्या आई खाली आल्या असता, त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी लागलीच वरच्या माळ्यावरील इतर सदस्यांना ही बाब सांगितली. दरवाजा उघडून आत पाहिले असता हेमांगिनी यांनी मुलासह टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महाजन कुटुंबीय परिसरात अत्यंत परिचित आणि सर्वांशी मिळून-मिसळून राहणारे असल्याने या घटनेने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. एन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महिलेने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून शनिपेठ पोलीस या प्रकरणी पुढील सखोल तपास करत आहेत.















Discussion about this post