मुंबई । भारतात यंदाच्या मान्सूनबाबत चिंता वाढताना दिसत आहे. प्रशांत महासागरातील ‘अल निनो’चा प्रभाव सातत्याने मजबूत होत असून, त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदाच्या मान्सूनचा अंदाज आणखी कमी केला आहे. एप्रिलमध्ये सरासरीच्या ९४ टक्के पावसाचा अंदाज देणाऱ्या स्कायमेटने आता तो घटवून ८५ टक्क्यांवर आणला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा देशात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता ७० टक्क्यांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, याचा अर्थ देशात दुष्काळ जाहीर झाला आहे असा होत नाही. स्कायमेटच्या निकषांनुसार, दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्यास तो दुष्काळाच्या श्रेणीत मानला जातो.
अल निनोमुळे भारताची चिंता का वाढली?
‘अल निनो’दरम्यान प्रशांत महासागरातील समुद्राचे पाणी सामान्यपेक्षा अधिक उष्ण होते. त्याचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. भारतासाठी ही स्थिती चिंताजनक मानली जाते, कारण मजबूत अल निनोचा अनेकदा कमकुवत मान्सूनशी संबंध राहिला आहे. अमेरिकेच्या NOAAच्या अंदाजानुसार, २०२६ च्या शरद ऋतू आणि हिवाळ्यात अल निनो अत्यंत मजबूत होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे. सध्या ‘सुपर अल निनो’ निर्माण झाला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नसले, तरी अल निनोचा प्रभाव वाढत असल्याने भारतात कमी पावसाचा धोका वाढल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
जून-जुलैमध्ये १३ टक्के कमी पाऊस
यंदाच्या मान्सूनची सुरुवातच तुलनेने कमजोर राहिली. जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलैमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी अनेक भागांत पावसाने ब्रेक घेतला. १ जून ते ३१ जुलैदरम्यान देशात सरासरीपेक्षा सुमारे १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. आता ऑगस्टमध्ये LPAच्या केवळ ८४ टक्के, तर सप्टेंबरमध्ये सुमारे ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. त्यामुळे संपूर्ण मान्सूनचा अंदाज ८५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे.
IMDचाही मान्सूनबाबत सावध अंदाज
सरकारी हवामान विभाग IMDनेही मान्सूनच्या अंदाजात कपात केली आहे. एप्रिलमध्ये IMDने सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस हा अंदाज ९० टक्क्यांवर आणण्यात आला.त्यामुळे स्कायमेट आणि IMD या दोन्ही संस्थांच्या अंदाजातून यंदाचा मान्सून कमजोर राहण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, स्कायमेटचा सध्याचा अंदाज IMDच्या तुलनेत अधिक चिंताजनक आहे.
मान्सून कमजोर राहिल्यास त्याचा सर्वाधिक थेट परिणाम शेतीवर होण्याची शक्यता आहे. भात, कापूस, सोयाबीनसह विविध खरीप पिके मान्सूनच्या पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. पावसाचे प्रमाण कमी होण्यासोबतच पावसाची वेळही बिघडल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.याचा परिणाम पुढे डाळी, गळित धान्य, भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमजोर मान्सूनचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या घरखर्चावरही होऊ शकतो.
धरणांच्या पाणीसाठ्यावरही परिणाम
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस कमी राहिल्यास धरणे, तलाव आणि जलाशयांमधील पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा फटका विशेषतः रब्बी हंगामाला बसू शकतो. गहू, हरभरा आणि मोहरीसारख्या रब्बी पिकांसाठी हिवाळ्यात सिंचनाची गरज असते. त्यामुळे मान्सूनचे शेवटचे दोन महिने यंदाच्या खरीप हंगामासोबतच पुढील रब्बी हंगामासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत.















Discussion about this post