मुंबई । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) २ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता आता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे.
महागाई भत्त्यातील ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आणि पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीतील वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू राहणार आहे. जानेवारी २०२६ ते जुलै २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे ऑगस्टच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांना सात महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे.
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा
महागाई भत्त्यातील या वाढीमुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पात्र लाभार्थींना आर्थिक दिलासा मिळणार आहे. महागाईच्या काळात पगारात वाढ होण्यासोबतच मागील सात महिन्यांची थकबाकी एकरकमी मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम अदा करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती यापुढेही कायम राहणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित विभागांनाच खर्चाची तरतूद करावी लागणार
वाढीव महागाई भत्त्यामुळे होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकले जातात, त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येणार आहे. हा खर्च संबंधित मंजूर अनुदानातून भागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच अनुदानप्राप्त संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, त्यांच्या सहाय्यक अनुदानाचा खर्च ज्या उपलेखाशीर्षाखाली केला जातो, त्याच उपलेखाशीर्षाखाली वाढीव महागाई भत्त्याचा खर्च दाखविण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात प्रत्यक्ष वाढ होणार असून, ऑगस्ट महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांसाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे.















Discussion about this post