जळगाव । सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव बायपासवर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना आणखी काही दिवस पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्त्यांचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने प्रशासनाने वाहतूक वळविण्याचा निर्णय १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत कायम ठेवला आहे.
जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळकडून आसोदाकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावरील रस्ता तसेच पाळधीकडून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे पुलावरील मार्गाला मोठ्या प्रमाणात तडे जाऊन रस्ता खचला होता. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. सुरुवातीला १ ते ५ ऑगस्टदरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
मात्र, दुरुस्तीचे काम अपेक्षेपेक्षा अधिक कालावधीचे असल्याने NHAI ने पोलीस प्रशासनाला मुदतवाढीची विनंती केली आहे. त्यानुसार धुळेकडून नागपूरकडे जाणारा एकेरी मार्ग १२ ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे ६ ऑगस्ट रोजी पहाटे १२.०१ वाजल्यापासून १२ ऑगस्ट रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत बायपासवरील संबंधित मार्गावरील वाहतूक बंद ठेवून सर्व वाहने पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३(१)(बी) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. वाहतुकीची कोंडी टाळणे, अपघातांना आळा घालणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यकपणे बायपासवरील बंद मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
असे राहणार पर्यायी मार्ग
भुसावळ/नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहने : भुसावळ – तरसोद फाटा – काळिका माता मंदिर – अजिंठा चौफुली – आकाशवाणी चौक – शिवकोलनी – बांभोरी पूल – पाळधी.
मुंबईकडून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने : पाळधी – बांभोरी – शिवकोलनी – आकाशवाणी चौक – अजिंठा चौफुली – काळिका माता मंदिर – तरसोद फाटा – भुसावळ.
छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जाणारी वाहने : छत्रपती संभाजीनगर – पहूर – जामनेर – नाहाटा चौफुली – भुसावळ मार्गे.
नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने : नागपूर – भुसावळ – नाहाटा चौफुली – जामनेर – पहूर – छत्रपती संभाजीनगर.
इंदूर/बडोदा/नंदुरबारकडून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने : चोपडा – अडावद – यावल – भुसावळ मार्गे.
नागपूर/भुसावळकडून नंदुरबार/बडोदा/इंदूरकडे जाणारी वाहने : भुसावळ – यावल – अडावद – चोपडा मार्गे.















Discussion about this post