मुंबई । राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने मोठा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. पक्षाने सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने रद्द करत आता महेश तपासे आणि माजी आमदार विद्या चव्हाण यांनाच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून नियुक्त केले आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबाबत विविध राजकीय चर्चा सुरू आहेत. पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात असतानाच पक्षाने प्रवक्त्यांबाबतचा हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
सर्व नियुक्त्या रद्द
पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ४ ऑगस्ट २०२६ पासून यापूर्वी करण्यात आलेल्या पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हेच यापुढे पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडतील. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय चर्चांना उधाण
या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पक्षाने हा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला, इतर प्रवक्त्यांच्या नियुक्त्या का रद्द करण्यात आल्या आणि यामागे पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीचा भाग आहे का, याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षाकडून या निर्णयामागील कारणाबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.















Discussion about this post