बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सूरज पार्टीचे (JSP) संस्थापक प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी विजय मिळवत राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण केली आहेत. मतमोजणीदरम्यान २७व्या फेरीनंतर प्रशांत किशोर यांना ५५ हजार ७८० मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज सिन्हा यांचा पराभव करत बांकीपूर मतदारसंघावर जन सूरज पार्टीचा झेंडा फडकावला.
बांकीपूर हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन नवीन यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. नितीन नवीन हे या मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती आणि त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.
विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले, “मी आमदार झालो म्हणून बांकीपूर एका रात्रीत बदलणार नाही. मात्र पुढील दोन-तीन महिन्यांत मतदारांना सकारात्मक बदल दिसतील. या निकालातून बांकीपूरच्या जनतेने भाजप नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला आहे की, बिहारला सक्षम नेतृत्वाची गरज आहे.”
कोण आहेत प्रशांत किशोर?
बिहारचे रहिवासी असलेले प्रशांत किशोर हे देशातील आघाडीचे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. विविध पक्षांच्या निवडणूक मोहिमांचे नियोजन करून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
२०१५ मधील बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या विजयामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पंजाबमध्ये काँग्रेस, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस, दिल्लीत आम आदमी पक्ष, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूमध्ये द्रमुकसाठी त्यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले आहे.
बांकीपूरमधील या विजयामुळे प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पार्टीला मोठे राजकीय बळ मिळाल्याचे मानले जात असून, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.















Discussion about this post