नवी दिल्ली । नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत तब्बल २६ दिवस उपोषण केलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सुरू झालेल्या टीकेवर अखेर मौन सोडले आहे. सरकारसोबत कोणताही व्यवहार (डील) केलेला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी मध्यरात्री वांगचुक यांनी उपोषण सोडले. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी सरकारशी तडजोड केल्याचा आरोप केला जाऊ लागला. या आरोपांवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“२६ दिवस उपाशी राहिल्यानंतरही मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागणार आहे का? जर सरकारसोबत डीलच करायची असती, तर मी एवढे दिवस उपोषण केले असते का?” असा थेट सवाल त्यांनी टीकाकारांना केला. आंदोलनातील आपल्या भूमिकेवर शंका घेणे वेदनादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पत्नीचाही टीकाकारांवर निशाणा
दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत टीका करणाऱ्यांना सुनावले. त्यांनी म्हटले की, “राजकीय विश्लेषण करण्यापेक्षा या आंदोलनासाठी वांगचुक यांनी मोजलेली वैयक्तिक किंमत समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.”
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग २६ दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे तब्बल ११ किलो वजन घटले असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया
वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या त्यागाचे आणि आंदोलनातील भूमिकेचे कौतुक केले आहे, तर काहींनी सरकारसोबत तडजोड केल्याचा आरोप करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर वांगचुक यांनी केलेले स्पष्टीकरण चर्चेचा विषय ठरले आहे.















Discussion about this post