वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडीतील मृत्यूच्या गाजलेल्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन पोलीस निरीक्षकासह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०११ मध्ये चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाचा पोलिसांच्या कथित मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निर्णय दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे २०११ रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली होती. यावेळी चोरीच्या संशयावरून बेग्या पवार यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, त्यानंतर १० मे २०११ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेचा सीआयडीने ३४ दिवस तपास करून संबंधित पोलिसांविरुद्ध खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तब्बल १५ वर्षे १ महिना २३ दिवसांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला.
न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
निकालानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत, दीर्घ प्रतीक्षेनंतर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. तसेच तपास करणाऱ्या सीआयडी आणि सरकारी पक्षाचे आभार मानले. या निकालामुळे कायद्यापुढे सर्वजण समान असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया सरकारी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली.















Discussion about this post