जळगाव । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस मोठा झटका देणारा ठरला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना दिलासा मिळाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल ३,००० रुपयांची तर चांदीच्या दरात ८,००० रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. या अनपेक्षित दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये मोठी नाराजी असून बाजारपेठेकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै रोजी सोन्याचे दर १५०० रुपयांनी तर चांदी २००० रुपयांनी घसरली होती. बुधवारी विना जीएसटी सोने १ लाख ४० हजार रुपये प्रति १० ग्रॅम होते, ते आज ३ हजार रुपयांच्या वाढीसह १ लाख ४३ हजार रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे, बुधवारी २ लाख २५ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी थेट ८ हजार रुपयांच्या वाढीसह २ लाख ३३ हजार रुपयांवर गेली आहे.
लग्नाचा हंगाम संपल्याने आधीच बाजारात काहीशी मंदी असताना, आता अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांनी सोने-चांदी खरेदीला तूर्तास ब्रेक लावल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे दरात ही अस्थिरता निर्माण झाली असून, आगामी काही दिवस बाजारात असाच चढ-उतार राहण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.















Discussion about this post