अमळनेर : शहरातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात भीषण आग लागली. या आगीत मंदिराच्या लाकडी बांधकामाचे मोठे नुकसान झाले असून, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील हभप प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीला आगीची झळ बसली. मात्र, मुख्य मंदिर आणि देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हभप प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेजवळ शॉर्टसर्किट होऊन आग लागली. संपूर्ण मंदिरात मोठ्या प्रमाणात लाकडी बांधकाम असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर आणि पारोळा नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तब्बल १२ ते १५ अग्निशमन बंबांच्या मदतीने आणि दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी स्थानिक नागरिक, स्वयंसेवक तसेच विविध सामाजिक संस्थांनीही मदतकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
आगीमुळे मंदिर परिसरातील लाकडी बांधकामाचे मोठे नुकसान झाले असले, तरी मुख्य गाभारा आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना कोणतीही हानी पोहोचली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतरही हभप प्रसाद महाराज यांनी पंढरपूरची दिंडी अर्धवट सोडली नाही. “आधी पांडुरंग” ही भावना जपत त्यांनी नियोजित दिंडी प्रवास सुरूच ठेवला. त्यांच्या या निर्णयाची वारकरी आणि भाविकांमध्ये चर्चा होत आहे.
घटनास्थळी महसूल, पोलीस आणि अग्निशमन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होते. आगीच्या कारणाचा अधिक तपास सुरू असून, मंदिराच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात येत आहेत. तसेच इमारतीची सुरक्षितता तपासल्यानंतरच मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.















Discussion about this post