वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (IGCAR), कल्पक्कम यांनी ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) पदांच्या ५० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जुलै २०२६ आहे.या भरती प्रक्रियेद्वारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, किरणोत्सर्ग भौतिकशास्त्र तसेच विविध अभियांत्रिकी शाखांतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
विज्ञान शाखेतील उमेदवारांसाठी संबंधित विषयात एमएससी किंवा इंटिग्रेटेड एमएससी पदवी आवश्यक आहे. काही पदांसाठी पदवी स्तरावर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांचा अभ्यास केलेला असणे बंधनकारक आहे.
अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील बीई, बीटेक, एमई किंवा एमटेक पदवी असावी. काही पदांसाठी वैध GATE स्कोअर आवश्यक असून उत्कृष्ट गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळू शकते.
वयोमर्यादा
अर्जदारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
आकर्षक फेलोशिप
निवड झालेल्या उमेदवारांना होमी भाभा राष्ट्रीय संस्था (HBNI) अंतर्गत पीएचडी कार्यक्रमात प्रवेश दिला जाईल. संशोधन कालावधीत दरमहा २५ हजार ते ४२ हजार रुपयांपर्यंत फेलोशिप मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी IGCAR च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन JRF Recruitment 2026 या लिंकवर क्लिक करावे. नोंदणी पूर्ण करून अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि माहितीची पडताळणी करून अंतिम अर्ज सादर करावा.
संशोधन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात असून इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post