नाशिक । विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने राज्यभर दमदार यश मिळवले असले तरी नाशिकमधील निकालाने महायुतीच्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. या पराभवानंतर दराडे यांनी महायुतीवर विश्वासघाताचा आरोप केला असताना भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमधील निकाल अनपेक्षित असल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी या पराभवाची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. महायुतीकडे स्पष्ट संख्याबळ असतानाही अपेक्षित मतदान न झाल्याने नेमके कुठे आणि काय चुकले, याचा शोध घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाजन म्हणाले की, नाशिकमध्ये महायुतीकडे सुमारे पावणे पाचशे मतांचे संख्याबळ होते. निवडणुकीत विजय निश्चित मानला जात असतानाच निकाल उलट लागला. त्यामुळे हा पराभव नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कोणत्या स्तरावर साथ मिळाली नाही आणि कोणती राजकीय गणिते फसली याचा तपास केला जाणार आहे. यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून शिवसेना नेते उदय सामंत यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी महायुतीतील काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी दराडे सध्या पराभवाच्या मानसिक धक्क्यात असल्याचे सांगितले. महायुतीने किंवा भाजपने कोणत्याही प्रकारचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. गेल्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत पाठीमागून वार करण्याचे राजकारण आपण कधीच केले नसल्याचे सांगत त्यांनी आरोपांना उत्तर दिले.
महाजन यांनी राज्यातील एकूण निकालाकडेही लक्ष वेधले. १७ पैकी १६ जागांवर महायुतीने विजय मिळवला असून विरोधकांना मोठा धक्का बसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र नाशिकमधील निकालामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक असल्याचेही त्यांनी मान्य केले.
नाशिकमधील या पराभवानंतर महायुतीच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवर, अंतर्गत राजकारणावर आणि मतदारांच्या भूमिकेवर चर्चा सुरू झाली असून आगामी काळात या निकालाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post