नाशिक: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर प्रचंड मोठा राजकीय भूकंप झाला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच बंडखोरीमुळे चर्चेत राहिलेल्या या जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असून, नाशिकमध्ये महायुतीचा गेम फिरला आहे.
या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि पर्यायाने महायुतीला नाशिकमध्ये सर्वात मोठा धक्का बसला आहे. निकाल समोर येताच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणि मतदान केंद्राबाहेर गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी ‘हमसे जो टकरायेगा, वो मिट्टी में मिल जायेगा’ अशा घोषणा देत एकच जल्लोष सुरू केला आहे.
नाशिकमध्ये विजयासाठी ३०३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच फेरीत गोकुळ गीते यांनी हा कोटा पार केल्यामुळे दुसरी फेरी घेण्याची गरजच पडली नाही. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना पहिल्या फेरीत मिळाली 357 मतं. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली. मोजणी प्रक्रियेत 13 मतं अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 303 चा कोटा ठरलेला. पहिल्या फेरीतच कोटा पूर्ण झाल्याने दुसरी फेरी होणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट.
राज्यात एकीकडे महायुतीचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमधील पराभवामुळे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. नाशिकच्या निकालानंतर शिवसेना व महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या पराभवाची कारणमीमांसा सुरू झाली आहे.
दरम्यान, नाशिकमधील या निकालाचे पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात असून महायुतीतील स्थानिक नेतृत्व, बंडखोरी आणि संघटनात्मक ताकद याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post