जामनेर । जामनेर तालुक्यातील शहापूर गावात एका तरुण शेतकऱ्याने दाखवलेल्या अद्वितीय धाडसाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शेतात काम करत असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्यानंतरही न डगमगता या तरुणाने हिंस्त्र प्राण्याशी प्रत्यक्ष झुंज देत त्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून शेतकऱ्याच्या धैर्याचे कौतुक होत आहे.
शहापूर येथील मुकेश नाना डोंगरे हे आपल्या शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याशी जोरदार झुंज दिली.
जखमी अवस्थेतही मुकेश यांनी बिबट्यावरील पकड कायम ठेवली. त्यांच्या आरडाओरडीनंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या ग्रामस्थांनीही मदत केली. अखेर बिबट्याला जिवंत पकडण्यात यश आले आणि त्यानंतर त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
या थरारक घटनेत मुकेश डोंगरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकऱ्याने हिंस्त्र बिबट्याशी दिलेली ही जीवघेणी झुंज आणि दाखवलेले धैर्य पाहून परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या धाडसामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.















Discussion about this post