भुसावळ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कडक करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून भुसावळ उपविभागात १० जून रोजी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी प्रचंड पोलीस फौजफाट्यासह धडक ‘कोबिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत. गावठी कट्टा, तलवारी, चोरीची वाहने आणि अवैध दारू जप्त करत पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळे संपूर्ण भुसावळमधील सराईत गुन्हेगार, तडीपार आणि अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
६३ घरांची झडती; १०० हून अधिक गुन्हेगार रडारवर
या धडक मोहिमेदरम्यान पोलिसांनी शहरातील पाहीजे असलेले आरोपी, फरार गुन्हेगार आणि शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांवर आणि अड्ड्यांवर एकाच वेळी छापे टाकले. रेल्वे स्टेशन, मुख्य बस स्थानक आणि शहरातील विविध लॉजेसची कसून तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ६३ संशयित घरांची तपासणी केली. रेकॉर्डवरील ९९ गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली, तर ५४ हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. याशिवाय ११२ संशयित वाहनांची तपासणी करून नियमभंग करणारी २३ वाहने जप्त करण्यात आली.
४ जणांना बेड्या
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत या ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये खालील आरोपींना शस्त्रांसह रंगेहात अटक करण्यात आली आहे:
समीर शहा जब्बार शहा (रा. दिनदयाल नगर) – १ गावठी कट्टा आणि १ जिवंत काडतूस जप्त.
शम्मी प्रल्हाद चावरिया – १ लोखंडी तलवार जप्त.
दानिश शेख अकील – १ लोखंडी तलवार जप्त.
केवल अनिल टाक – १ धारदार कोयता (चॉपर) जप्त.
या चारही आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट (शस्त्र अधिनियम) अंतर्गत ४ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला एक आरोपी पोलिसांची परवानगी न घेता भुसावळ शहरात फिरताना आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छी मार्केट परिसरातून पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीची चोरीची होंडा ॲक्टिव्हा दुचाकी जप्त केली. ही दुचाकी चोपडा शहरातून चोरीला गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भुसावळ तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या तीन ठिकाणांवर पोलिसांनी धाड टाकत सुमारे १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.खंडवा लोहमार्ग पोलिसांच्या अटक वॉरंटमधील फरार आरोपीलाही या विशेष मोहिमेदरम्यान ताब्यात घेण्यात आले असून त्याला पुढील कारवाईसाठी संबंधित पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
भुसावळ उपविभागात राबविण्यात आलेल्या या व्यापक कोबिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला असून, अशा धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.















Discussion about this post