सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशातील व राज्यातील तरुणांसाठी जून महिना मोठी संधी घेऊन आला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांत मिळून तब्बल ४४ हजार ५०० पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
रेल्वे, बँकिंग, संरक्षण दल आणि कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) ही महाभरती राबवली जाणार आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेनुसार जाहीर झालेली ही भरती गेल्या काही महिन्यांतील सर्वात मोठी मेगा भरती मानली जात आहे. पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले असून मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही.
संरक्षण क्षेत्रात भरती
संरक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अविवाहित तरुणांसाठी संघ लोकसेवा आयोगाने (युपीएससी) संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस-२) अंतर्गत ४५१ पदांची भरती जाहीर केली आहे. – राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए-२) आणि नौदल अकादमीसाठी (एनए) ३९४ जागांवर भरती केली जाणार आहे. या दोन्ही भरतींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जून २०२६ आहे. भारतीय हवाई दलात (IAF) फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखांमधील ३७९ पदांसाठी १९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी निवड आयोग
कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त पदवीधर स्तर (सीजीएल) परीक्षेद्वारे विविध केंद्रीय विभागांत अधिकारी आणि लिपिकीय दर्जाची तब्बल १२२५६ पदे भरली जाणार आहेत. कोणत्याही शाखेतील इच्छुक पदवीधर उमेदवार या पदांसाठी २२ जून २०२६ पर्यंत उमेदवार आपले अर्ज ऑनलाइन करू शकतात.
रेल्वेचे भरती मंडळ
रेल्वे क्षेत्रातही तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. रेल्वे भरती मंडळाने असिस्टंट लोको पायलट पदांच्या ११ हजार १२७ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. १०वी उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधील आयटीआय (आयटीआय) किंवा डिप्लोमा धारक उमेदवारांना १४ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
बँकिंग क्षेत्रातही संधी
बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक ऑफ इंडियात (एसबीआय) ७९५० अप्रेंटिस पदांसाठी, तर बँक ऑफ बडोदामध्ये (बीओबी) ५००० अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या दोन्ही बैंकिंग भरतींसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख अत्यंत जवळ म्हणजेच ८ जून आहे अशी माहिती कळवण्यात आलेली आहे.















Discussion about this post