मुंबई : सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचं ‘रामनाम सत्य’ होणार होतं, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आणखी गंभीर दावा केला आहे. सुरतला गेलेल्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या संदर्भात तीन आमदारांची नावेही घेतली. त्यांच्या दाव्यानुसार, तत्कालीन आमदार प्रकाश आबिटकर हे सुरुवातीला सुरतहून परतण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांच्यावर दबाव आणून त्यांना रोखण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला.
अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्याबाबतही राऊत यांनी गंभीर आरोप केला. त्यांना हार्ट अटॅक यावा अशा पद्धतीचे उपचार करण्यात आले आणि इंजेक्शन देण्यात आले, असा दावा त्यांनी केला. त्यांना कशा पद्धतीने मारता येईल, याचा डाव असल्याचेही राऊत म्हणाले.यासोबतच कैलास पाटील यांच्याबाबतही राऊत यांनी धक्कादायक दावा केला. सुरतहून बाहेर पडत असताना त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. कैलास पाटील काही मैल पायी चालत बाहेर आल्याचेही राऊत यांनी सांगितले.
सुरतहून परतणाऱ्या आमदारांच्या जीवाला धोका निर्माण करण्यात आला होता, असा दावा करत राऊत यांनी, ‘माझ्याकडे ही तीन उदाहरणे आहेत,’ असे म्हटले. इतर आमदारांना जबरदस्तीने कोंडून ठेवण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.
‘पैसे देणारा नेता कोण?’
दरम्यान, शिंदे गटाच्या कुलाब्यातील एका शाखाप्रमुखाने नोटांचा बॉक्स दाखवल्याच्या कथित प्रकारावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कुलाब्यातील महायुतीचा तो मोठा नेता कोण? पैसे कोणी दिले आणि लाभार्थी कोण आहे, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.कुलाब्यातील संबंधित व्यक्तीचा महापालिका निवडणुकीशी संबंध असल्याचा दावा करत राऊत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. ५० लाख रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख करत, पैसे देणारा आणि घेणारा कोण, हे शोधून कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. राऊत यांच्या या गंभीर आरोपांमुळे सुरत बंडाच्या काळातील घडामोडींवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.














Discussion about this post