जळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील अंतर्गत बंडखोरी आता उघडपणे समोर आली असून, निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाही शिवसेनेतील बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवारामुळे महायुतीच्या नेत्यांची चिंता वाढली आहे.
महायुतीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्वतः पुढाकार घेत मित्रपक्षांच्या कार्यालयांना भेटी देत नगरसेवकांची मनधरणी केली. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र, या प्रयत्नांनंतरही शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने महायुतीसमोरील आव्हान कायम राहिले आहे.
याशिवाय अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी ३०० हून अधिक नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा करत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. त्यामुळे निवडणुकीत अधिकृत उमेदवारासाठी विजयाचा मार्ग सोपा राहिलेला नाही.
अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान अनेक इच्छुकांना माघार घेण्यास प्रवृत्त करण्यात यश आले असले तरी रेश्मा काळे आणि अनिल चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्यात महायुतीला यश मिळाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लढत भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपकडे स्वतःची सुमारे २४५ ते २४८ मते असल्याचे मानले जात असले तरी विजयासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यासाठी मित्रपक्ष, अपक्ष आणि इतर नगरसेवकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये तळ ठोकून मतदारांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत.दरम्यान, बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना काही नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील फारसे सक्रिय दिसून आले नसल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींमुळे जळगाव विधान परिषद निवडणूक आता केवळ औपचारिक राहिलेली नसून महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय समीकरणांची खरी परीक्षा ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.















Discussion about this post