नाशिक/जळगाव । आयपीएलच्या अंतिम सामन्याचा थरार रंगण्यापूर्वीच नाशिक पोलिसांनी ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अंबड पोलिसांनी लेखानगर येथील एका नामांकित हॉटेलवर मध्यरात्री छापा टाकत हायटेक बेटिंग अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत जळगावच्या तिघांसह चार जणांना अटक करण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सट्टेबाजीच्या जाळ्याचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी २९ मे रोजी रात्री उशिरा हॉटेलमधील रूम क्रमांक १०४ वर धाड टाकली. त्यावेळी राजस्थान आणि गुजरात संघांदरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याचे आढळून आले. कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये योगेश महाजन, सागर तायडे, सत्यम भोई (सर्व रा. जळगाव) आणि विनायक जाधव (रा. नाशिक) यांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात आरोपी ‘क्रिकेट लाईन गुरू’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून सट्टेबाजी चालवत असल्याचे उघड झाले आहे. ते मोबाईलद्वारे अनेक मोठ्या सट्टेबाजांच्या संपर्कात होते आणि सामन्यांवर बोली स्वीकारत होते. आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठीही मोठ्या प्रमाणात बेटिंगची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या प्रकरणात चार मुख्य आरोपींसह दहा सट्टेबाज ग्राहक आणि संबंधित संकेतस्थळाच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २.८३ लाख रुपये आहे.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सट्टेबाजीसाठी वापरण्यात आलेली काही सिमकार्ड इतर व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून मिळवण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे या रॅकेटचे धागेदोरे नाशिक आणि जळगावपलीकडे इतर राज्यांपर्यंत पोहोचले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, आयपीएलच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या ऑनलाइन सट्टेबाजीवर पोलिसांनी कडक नजर ठेवली असून, अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post