जळगाव । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असतानाच, शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक धांडे यांनी थेट बंडखोरी केली आहे. अधिकृत उमेदवाराला आव्हान देत या दोन्ही नेत्यांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना शिंदे गटातील स्थानिक नेत्यांना किंवा उमेदवाराला संधी दिली जाईल, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या पदरात पडली आणि भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर केली.
शिवसेनेच्या हक्काच्या उमेदवाराला डावलून ही जागा भाजपला सोडण्यात आल्याने शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप होता. याच अन्यायाविरोधात आणि शिवसैनिकांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी नगरसेविका रेश्मा काळे आणि दीपक धांडे यांनी थेट बंडखोरीचे पाऊल उचलले आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बंडखोर नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रेश्मा काळे म्हणाल्या की, आजपर्यंत या जागेवर महिलांना संधी दिली गेली नाही. म्हणून मी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीच आपण मैदानात उतरल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकीकडे भाजपचे संकटमोचक ना. गिरीश महाजन यांनी जळगावातील ६३० पैकी जवळपास ५०० नगरसेवक महायुतीचे असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता स्वतःच्याच मित्रपक्षातील (शिंदे गट) नगरसेविका आणि पदाधिकाऱ्याने बंडखोरी केल्यामुळे महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.















Discussion about this post