जळगाव । गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वीज खंडिततेच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांचा अखेर संताप अनावर झाला. जळगाव जिल्ह्यातील विस्कळीत वीजपुरवठ्याविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर एक आगळेवेगळे आणि आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी आणि शेतकऱ्यांच्या या संयुक्त एल्गारापुढे अखेर महावितरण प्रशासनाला झुकावे लागले. महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना सलग ८ तास विनाखंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे अधिकृत लेखी आश्वासन दिले आहे.
आंदोलनादरम्यान शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना विनाखंडित सलग १० तास वीजपुरवठा देण्याची मागणी केली. विद्युत कायदा २००३ च्या कलम ४३ आणि ५७ नुसार शेतकऱ्यांना सुरळीत वीज मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला खंडित वीजपुरवठा हा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या गुणवत्ता मानकांचा भंग असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आंदोलनाचा वाढता आक्रमक पवित्रा पाहता महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सलग ८ तास वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यासंदर्भातील अधिकृत लेखी पत्रही महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.















Discussion about this post