मुंबई । यंदाच्या मान्सून हंगामात संपूर्ण देशासह महाराष्ट्रावर ‘एल निनो’चे मोठे संकट घोंघावत आहे. एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे.आज शुक्रवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजात हवामान खात्याने देशात यंदा सरासरीच्या फक्त ९० टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ९२ टक्के पावसाचा अंदाज होता, मात्र आता त्यात आणखी घट करण्यात आल्याने बळीराजासह संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे.
हवामान तज्ज्ञांनी महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा प्रभाव अधिक जाणवेल, तर सप्टेंबरमध्ये तो सर्वाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होणार असून अनेक भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात घट होऊ शकते. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची मोठी घटजाणवण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
मान्सून काळात कमी पाऊस झाल्यास शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज निर्मिती आणि आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. याचे परिणाम पुढील वर्षभर जाणवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय जून महिन्यात काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत पोचतो. मात्र, यंदा मान्सूनच्या प्रगतीला उशीर झाल्याने उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेचा प्रभाव वाढू शकतो, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने ९० टक्के पावसाचा अंदाज दिला असला तरी, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता तब्बल ६० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये यंदाचा मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.















Discussion about this post