जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनानंतर विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तब्बल २४ वर्षांपूर्वीच्या व्यवहारावरून राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
खडसे म्हणाले की, रात्री बारा वाजता चमेलीबाई तायडे यांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केला. या प्रकरणात महार वतनाची जमीन हडप केल्याचा, कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा तसेच व्यवहारात जास्त पैसे देण्याचे सांगून पैसे न दिल्याचा आरोप करण्यात आला. यासोबतच माझ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टही लावण्यात आला. या प्रकरणात आपण न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. “२४-२५ वर्षांनंतर गुन्हा दाखल होणे संशयास्पद असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचे वाटते,” असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्याचा दावा खडसे यांनी केला.
तसेच, या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याचा संदर्भ लागू होत नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. २००२ साली व्यवहार झाला, त्यानंतर जमिनीची नोंद व हस्तांतरण झाले. मात्र २४ वर्षांत कोणतीही तक्रार करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारीत तथ्य नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आणि माझा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला,” असे खडसे म्हणाले.
यावेळी त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत म्हटले की, “माझ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी विरोधक जंग जंग पछाडत आहेत. आमदारदेखील रात्री बारा वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दबाव टाकत होते. खोटे गुन्हे दाखल करून नाथाभाऊंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
माझ्याविरोधात यापूर्वीही सत्तेचा गैरवापर करून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या तक्रारीत कुठलेही सत्य नाही, हे पुढे स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी खडसे यांनी विरोधकांना लक्ष्य करत म्हटले, आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत आणि न्यायालयानेच विरोधकांच्या थोबाडीत मारली आहे. विरोधकांना लाज-शरम असेल तर त्यांनी आत्मपरीक्षण करावे.















Discussion about this post