मुंबई: आतापर्यंत तुम्ही ज्या कागदी नोटा वापरत आहात, त्या लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. भारतात कागदी नोटांऐवजी आता ‘पॉलिमर’ म्हणजेच प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याच्या हालचाली भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अत्यंत वेगाने सुरू केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या बोर्ड बैठकांमध्ये या महत्त्वाच्या प्रस्तावावर सखोल चर्चा झाली असून, लवकरच याबाबतचा एक प्रायोगिक प्रकल्प सुरू केला जाऊ शकतो.
‘बिझनेस स्टँडर्ड्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेच्या पाटणा आणि मुंबई येथे झालेल्या गेल्या दोन बोर्ड बैठकांमध्ये पॉलिमर नोटा चलनात आणण्याच्या निर्णयावर विस्तृत चर्चा झाली. भारतात सध्या पॉलिमर नोटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून, माध्यम वर्तुळातही या नव्या चलनाबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
कागदी नोटा बदलण्याचे कारण काय?
सध्या वापरात असलेल्या कागदी नोटा सतत हाताळल्यामुळे लवकर खराब होतात, फाटतात किंवा पाण्यात भिजून नष्ट होतात. यामुळे दरवर्षी आरबीआयला मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा बदलून नव्या नोटा छापाव्या लागतात. याउलट, प्लास्टिक नोटांचे अनेक फायदे आहेत. पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटा कागदी नोटांपेक्षा जास्त काळ टिकतील, त्या लवकर खराब होणार नाहीत किंवा फाटणार नाहीत. या नोटांची निर्मिती आणि छपाईचा खर्च कागदी नोटांच्या तुलनेत खूप कमी असेल, ज्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचेल. प्लास्टिकच्या असल्याने या नोटा पाण्यात भिजून खराब होण्याचा धोका नसेल.
एटीएम मशीनसाठीही ठरणार सुसंगत
सध्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर एटीएम (ATM) मशीनचा वापर केला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या पॉलिमर नोटा या एटीएम मशीनशी पूर्णपणे सुसंगत असतील. म्हणजेच, सध्याच्या एटीएम मशीनमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बदल न करता या प्लास्टिक नोटा सहज स्वीकारण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी यंत्रणा सक्षम आहे.
लवकरच होणार घोषणा!
रिझर्व्ह बँकेकडे या अत्याधुनिक नोटा छापण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने आणि तांत्रिक यंत्रणा आधीपासूनच उपलब्ध आहे. केंद्रीय बँक या पॉलिमर नोटांच्या वितरणासाठी आधी देशातील काही निवडक शहरांमध्ये एक पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात या नोटा लागू केल्या जातील. आरबीआयकडून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.















Discussion about this post