मुंबई । पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी थेट संपर्क साधून या प्रकरणाची मुळे खणून काढण्याचे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, “मी दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांशी बोललो असून त्यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कोणाचीही हयगय करू नका. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घ्या आणि कठोर कलमे लावा.” एकही दोषी पाठीशी घातला जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग गजाआड; पोलिसांची मोठी कारवाई
या प्रकरणाचा वेगाने तपास करण्यासाठी पोलीस आणि अबकारी (राज्य उत्पादन शुल्क) विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. या संपूर्ण कांडाचा मुख्य सूत्रधार कर्नल विरखा सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपीसह त्याच्या इतर ८ साथीदारांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
रात्रभर दारूच्या अड्ड्यांवर छापेमारी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रात्रीपासूनच अवैध दारूच्या अड्ड्यांवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ही विषारी दारू नेमकी कुठे तयार करण्यात आली होती आणि तिचा पुरवठा कोठून झाला, याचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके कसून तपास करत आहेत. या धडक कारवाईमुळे अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.















Discussion about this post