जळगाव । नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फातेमा नगर भागातील ३६ खोली परिसरात सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांनी गुरुवारी (२८ मे) रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ९ आरोपींना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून तब्बल १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोठ्या कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर फातेमा नगर येथील ३६ खोली परिसरात अचानक छापा टाकण्यात आला. या ठिकाणी गोवंश सदृश्य जनावरांची अवैधरित्या कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळीच आरोपींना पकडत मोठा साठा जप्त केला.
कारवाईदरम्यान ३ गायी, १ बैल, ९ गोन्हे, २ लहान वासरे, सुमारे २०० किलो गोवंशाचे मांस तसेच वाहतूक आणि विक्रीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाखांहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात ९ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील करीत आहेत.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आणि त्यांच्या पथकाने केली.















Discussion about this post