पाचोरा | पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये तरुण व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. जळगाव रोडवरील याराना हॉटेलच्या लॉजिंगमध्ये त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. रवींद्र संजय मोरे (वय २५, रा. गिरड, ता. भडगाव) असं मृत तरुणाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडाही झाला होता. दरम्यान ही आत्महत्या नसुन घातपात झाला असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला.
मूळ भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी असलेले रवींद्र मोरे हे पाचोरा शहरातील नगरपालिका जिन्यातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये “मालक मेन्स वेअर” नावाचे कपड्यांचे दुकान चालवत होते. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यानी अत्यंत कमी वयात स्वतःचा व्यवसाय उभा केला होता आणि व्यापारी क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
गुरुवारी दुपारी रवींद्र यांनी लॉजमध्ये गळफास घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना तातडीने आधी एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या मृत्यूबाबत रवींद्र यांच्या नातेवाइकांनी तीव्र संशय व्यक्त केला आहे. हा प्रकार नेमका आत्महत्या आहे की घातपात? याबाबत शहरात विविध चर्चा सुरू आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच रवींद्र मोरे यांचा साखरपुडा झाला होता. घरात मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र, लग्नघरात सनई-चौघडे वाजण्यापूर्वीच रवींद्र यांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत रवींद्र यांच्या पश्चात आई, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. एकुलत्या एक तरुण मुलाचा मृतदेह पाहून आईने केलेल्या आक्रोशाने ग्रामीण रुग्णालय परिसरात उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.















Discussion about this post