जळगाव । जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा पारा आता चांगलाच चढणार आहे! कारण मुदत संपलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकले असून, प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे ‘गावकी’च्या राजकारणात सक्रिय असलेल्या आणि आरक्षण काय निघणार याकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. ऐन पावसाळ्यात म्हणजेच जुलै महिन्यात जळगाव जिल्ह्यात राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळणार असून, नेत्यांनी आतापासूनच आपापल्या सोयीच्या प्रभागांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्क्यांपर्यंत जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी आरक्षण एकत्रितपणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेची अंतिम जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
असा असेल आरक्षण सोडतीचा कार्यक्रम :
८ जून – विशेष ग्रामसभेची नोटीस/सूचना प्रसिद्ध
१२ जून – विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत
१९ जून – प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप जाहीर
१९ ते २५ जून – हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार
०३ जुलै – उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय
०८ जुलै – जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मंजुरी
१० जुलै – अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर
दरम्यान, जुलै महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असून, आरक्षणाच्या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post