जळगाव : राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. भारतीय हवामान विभागाने अमरावती, वर्धा आणि अकोला जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली असून तब्बल ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यंदाच्या उन्हाळ्यात देशातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये वर्ध्याचा समावेश होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महाबळेश्वर येथे नीचांकी १८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जळगावकरांना काहीसा दिलासा :
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रचंड काहिली आणि उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना निसर्गाने काहीसा दिलासा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा हाहाकार सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यात मात्र गेल्या २४ तासांत तापमानात घट नोंदवली गेली आहे.
जळगाव जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या बदललेल्या हवामानामुळे तापमानाचा पारा खाली आला आहे. मंगळवारी जळगावचा पारा ४३.४ अंश सेल्सिअसवर होता, तो बुधवारी घसरून ४२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला. केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या तापमानातही सुमारे १ अंशाची घसरण झाली असून रात्रीचे तापमान २६.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. ढगाळ वातावरण आणि तापमानातील या घसरणीमुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.















Discussion about this post